नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांना बड्या उमेदवाराचा जाहीर पाठिंबा; शहराच्या राजकारणात खळबळ
सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत असताना शहराच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील एक बडे, प्रभावशाली आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मोहसीन इलाही खतीब यांनी अपक्ष उमेदवार विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके यांच्या समर्थनाची घोषणा करताच शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.खतीब यांच्या या निर्णयामुळे निवडणुकीचे सर्व समीकरणच नव्याने मांडले जात असून शहरातील राजकीय गटांची पुन्हा नव्याने मांडणी होण्याचे संकेत मिळत आहेत.
मोहसीन खतीब हे स्वतः एक मजबूत मतदारसंघ असलेले, स्थानिक पातळीवर प्रभावी आणि कार्यकर्त्यांमध्ये लोकप्रिय नेते मानले जातात. त्यांच्या पाठीशी नेहमी उभा राहणारा मजबूत गट, सामाजिक कार्यकर्ते, व्यापारी वर्ग आणि युवक संघटनांची ताकद झपके यांच्या बाजूला वळल्याने ही निवडणूक पूर्णपणे नवी दिशा घेऊ लागली आहे.
राजकीय विश्लेषकांच्या मते खतीब यांच्या गटाचे मतदानी वजन मोठे आहे. या गटाचा पाठिंबा मिळाल्याने झपके यांच्या उमेदवारीला मोठी धार मिळाली आहे. त्यांच्या प्रभागांत खतीब गटाचा प्रभाव असून त्यांचे समर्थक ज्या दिशेने झुकतात, त्या दिशेने जनमानस वळण्याची शक्यता वर्तवली आहे.
मोहसीन खतीब यांच्या रूपाने एका मोठ्या गटाचे पाठबळ मिळाल्याने अपक्ष उमेदवार विश्वेश झपके यांची ताकद वाढली आहे. या घडामोडीमुळे नगराध्यक्ष निवडणूक अधिकच चुरशीची बनली असून आगामी दिवसांत आणखी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.काही स्थानिक नेत्यांनीही या घोषणेनंतर झपके यांच्या बाजूने कल दर्शवण्यास सुरुवात केली आहे. येत्या काही दिवसांत आणखी काही महत्त्वाच्या घोषणा होतील, अशी राजकीय पातळीवर जोरदार चर्चा आहे. झपके यांच्या प्रचाराची शैली, तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह, तंत्रज्ञानावर आधारित मोहीम आणि शहर बदलण्याचा संदेश या सगळ्यामुळे युवक आणि पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे निरीक्षक सांगतात. आता या नव्या पाठिंब्यामुळे त्यांची ताकद आणखी वाढली आहे. एकूणच, या घडामोडीमुळे नगराध्यक्ष निवडणुकीचे राजकीय वातावरण तापले असून शहरातील सर्वांचे लक्ष झपके यांच्या वाढत्या प्रभावाकडे वळले आहे. पुढील काही दिवसांत प्रचाराचा जोर, नवीन समर्थन घोषणांची शक्यता, आणि बदलत्या राजकीय समीकरणांमुळे ही निवडणूक अधिकच रंगतदार होणार हे निश्चित आहे.
*चौकट - १*
शहराच्या विकासासाठी स्वच्छ प्रतिमा, आधुनिक दृष्टी आणि तंत्रज्ञानाची जाण असलेल्या नेतृत्वाची गरज आहे. विश्वेश झपके हे प्रामाणिक, सुशिक्षित आणि विकासाच्या स्पष्ट आराखड्यासह काम करणारे उमेदवार आहेत. त्यांच्या हातात शहर सुरक्षित राहील .शहराला सध्या सर्वात जास्त गरज आहे ती विकासाभिमुख काम करणाऱ्या नेतृत्वाची. शहर उज्ज्वल भविष्याकडे न्यायचे असेल, तर अशा उमेदवारांना पाठिंबा देणे गरजेचे आहे. तरी सांगोला शहरातील सुज्ञ मतदार बंधू-भगिनींनी विश्वेश झपके यांना प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करावे.”
*मोहसीन इलाही खतीब*
*चौकट-२* मोहसीन खतीब यांच्यासारख्या प्रबळ उमेदवाराचा पाठिंबा मिळणे हा माझ्यावर ठेवलेला विश्वास शहरासाठी अधिक प्रामाणिकपणे काम करण्याची प्रेरणा देणारा आहे. नगराध्यक्ष म्हणून संपूर्ण शहराचे रस्ते, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, महिलांसाठी सबलीकरण, शिक्षण व रोजगार निर्मिती या सर्व क्षेत्रांत ठोस बदल घडवून आणण्याचा माझा प्रयत्न असेल.शहर बदलण्याची वेळ आली आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पारदर्शक, जबाबदार आणि विकासाभिमुख प्रशासन देण्यास मी कटिबद्ध आहे.
*विश्वेश प्रबुद्धचंद्र झपके*



No comments:
Post a Comment