Recent Tube

Breaking

Wednesday, June 11, 2025

वाकी(शिवणे)ता. सांगोला येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाचे श्री. अनिल कापसे यांची बिनविरोध निवड

 



वाकी(शिवणे)ता. सांगोला येथील विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या गटाचे श्री. अनिल कापसे यांची बिनविरोध निवड


(संस्थेच्या मालकीची जागा व इमारत पूर्ण झाल्यानंतरच सोसायटीच्या वतीने सत्कार स्वीकारणार-  दिपकआबा)


 सांगोला तालुक्यातील अतिशय सक्षम व जिल्ह्यामध्ये नावाजल्या जाणाऱ्या वाकी(शिवणे) विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाचे युवक नेते श्री. अनिल कापसे यांची नुकतीच सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.

      गेली सलग 16 वर्षे 100% वसुली असणाऱ्या या सोसायटीमध्ये शिवसेना व मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील गटाची सत्ता आहे. युती धर्मामध्ये चेअरमन पदासाठी ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन चेअरमन श्री.संजय सदाशिव जाधव यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या पदावर श्री.अनिल कापसे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीसाठी सांगोला तालुका सहकारी निबंधक कार्यालयाचे श्री.शेख यांनी काम पाहिले.चेअरमन पदासाठी श्री. अनिल कापसे यांचा एकमेव अर्ज आल्याने श्री.शेख यांनी  अनिल कापसे यांना चेअरमन पदी बिनविरोध निवड म्हणून घोषित केले.

       ही निवड झाल्यानंतर मा. आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या सांगोला येथील संपर्क कार्यालयामध्ये मा. आबांनी त्यांचा सत्कार करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सत्काराला उत्तर देताना नूतन चेअरमन श्री.अनिल कापसे यांनी आपल्या मनोगतात मा.आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सभासदांच्या व गावाच्या हितासाठी प्रामाणिकपणे कार्य करून संस्थेचे नाव उज्वल करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यांनी यावेळी सांगितले. यावेळी मधुकर सपाटे, उद्धव पाटील, शिवाजीराव साळुंखे ,तुकारामआबा जाधव, श्रीकांत जाधव ,संतोष रोकडे, अनिल जाधव, रघुनाथ पाटील, मच्छिंद्रअण्णा जाधव (गुरुजी), जयराम कुंभार, संतोष पाटील यांचे सह स्थानिक ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे संचालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


 *चौकट* - या सत्कार समारंभ प्रसंगी वाकी शिवणे येथील ग्रामस्थांनी मा.आमदार दिपकआबा साळुंखे  पाटील यांच्या सत्कारासाठी हार व मानाचा फेटा आणला असता मा.आबांनी त्यांना नम्रपणे नकार देऊन विकास सेवा सोसायटीची स्वतःच्या मालकीची जागा व इमारत झाल्यानंतर हा सत्कार स्वीकारू असे सांगितले व आपले मनोगत व्यक्त करताना वाकी शिवणे ता.सांगोला येथील अतिशय सक्षम असलेल्या विकास सेवा सोसायटीच्या चेअरमन पदाला श्री.अनिल कापसे यांची सर्वांनी निवड करून या पदाला न्याय देणारे योग्य व सक्षम नेतृत्व दिले असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. गावच्या विकासासाठी राजकारण विरहित कामकाज करण्याचा सल्ला देत संस्थेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोपतारी मदत करण्याचे आश्वासन यावेळी उपस्थितांना दिले.

No comments:

Post a Comment