Recent Tube

Breaking

Thursday, April 18, 2024

पाचेगांव खुर्द ग्रामपंचायत मधील तीन चाकी व्यवस्था ठरतेय कुचकामी.



पाचेगांव खुर्द ग्रामपंचायत मधील तीन चाकी व्यवस्था ठरतेय कुचकामी.



पाचेगांव खुर्द मध्ये नेते तुपाशी; जनता मात्र रस्त्याविना उपाशी.



पाचेगांव खुर्द/प्रशांत मिसाळ;पाचेगांव खुर्द ग्रामपंचायतीच्या हद्दीअंतर्गत येणाऱ्या नलवडेवाडी येथे ये जा करण्यासाठी असणाऱ्या रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली असून ग्रामपंचायत मध्ये शिवसेना, राष्ट्रवादी आणि शेकाप या तिन्ही पक्षाची सत्ता आहे. जनतेने मोठ्यामनाने सरपंच आणि सदस्य यांना बिनविरोध निवडून दिलेले आहे. मात्र निवडून दिल्यानंतर या तीनही पक्षाच्या नेत्यांना जनतेचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पाचेगांव खुर्द येथील तीन चाकी व्यवस्था कुचकामी ठरत असल्याच्या चर्चा येथील स्थानिक नागरिकांतून चालू आहेत.


या गावाच्या अंतर्गत येणाऱ्या नलवडेवाडी येथे जाण्यासाठी गेल्या 8 ते 10 वर्षांपूर्वी डांबरी रस्ता करण्यात आला होता. गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून स्थानिक लोकप्रतिनिधी यांना वेळोवेळी मागणी करून देखील फक्त आश्वासन मिळत असून नेते तुपाशी अन जनता मात्र रस्त्याविना उपाशी अशी येथील अवस्था झाली आहे.

 या रस्त्यावरून पाचेगांव खुर्द ते राजुरी, मानेगांव, डोंगरगांव सह अनेक छोट्या मोठ्या गावांना जाण्यासाठी हा रस्ता मधला मार्ग असल्याने या रस्त्यावरून वाहनांची नेहमी वर्दळ असते. गेल्या काही दिवसापूर्वी पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन गेल्याने जुनामळा येथे रस्ता खोदण्यात आला होता. पाईपलाईनचे काम झाल्यानंतर तो खड्डा मुरूम टाकून ओबड-धोबड पद्धतीने बुजविण्यात आला असून रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना प्रवास करताना अनेकदा अपघाताला सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे प्रशासन एखादा निष्पाप बळी जाण्याची वाट बघतंय की काय असा संतप्त सवाल विचारला जात आहे.


नलवडेवाडी येथील स्थानिक प्रतिनिधी बाहेरगावी वास्तव्यात असल्याने त्यांना या रस्त्याने जाण्याचा फारसा योग येत नाही त्यामुळे जनतेच्या वेदना त्यांना कशा समजणार? वेळोवेळी या रस्त्याविषयी त्यांच्या कानावर घातले असता त्यांच्याकडूनही आश्वासनाव्यतिरिक्त काहीच मिळत नसल्याने जनतेने न्याय मागायचा तरी कोणाकडे? हा प्रश्न येथील जनतेला पडला आहे. नेते सध्या लोकशाहीचा उत्सव साजरा करीत तुपाशी असले तरी जनता मात्र उपाशीच आहे. त्यामुळे लवकरात लवकर पाचेगांव खुर्द ते नलवडेवाडी येथील रस्ता डांबरीकरण करून मिळावा अशी मागणी येथील जनतेकडून होत असून ग्रामपंचायतीच्या तीन पक्षीय सत्ताधारी नेत्यांनी याकडे लक्ष देऊन येथील रस्त्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

No comments:

Post a Comment