शेवग्याच्या शेंगाचे महत्व पहा
शेवग्याच्या शेंगाचे महत्व, तुम्ही खाता कि नाही ?
शेवग्याच्या शेंगा पोषणमूल्यांनी भरपूर असून त्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व, कॅल्शियम, लोह, फॉस्फरस आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. या घटकांमुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, रक्तशुद्धी होते, हाडे मजबूत राहतात तसेच हृदय, यकृत, श्वसनमार्ग आणि त्वचेसाठी त्या अत्यंत हितकारक ठरतात. मधुमेह नियंत्रण, पचन सुधारणा आणि कर्करोग प्रतिबंधातही त्या मदत करतात. शेंगांमधील चोथा पचनसंस्थेला चालना देतो आणि आतड्यांचे आरोग्य टिकवतो.
शेवग्याच्या शेंगा आठवड्यातून तीन ते चार वेळाच खाव्यात. ताज्या, सरळ व हिरव्या शेंगा निवडाव्यात. स्वच्छ धुऊन, बाहेरील चोथट थर काढून त्यांचे तुकडे करून वाफवावे किंवा पाण्यात शिजवावे, ज्यामुळे ‘क’ जीवनसत्त्व टिकून राहते. आपल्या आहारात त्या आमटी, सांबार, पिठलं, वांग्याची भाजी, कढी, सूप, लोणचे अशा विविध पदार्थांमध्ये वापरल्या जातात.
भारतातील विविध राज्यांमध्ये त्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतींनी होतो — गोव्यात नारळाच्या दुधात भाजी, दक्षिणेत बीसीबेळी भात व सांबार, गुजरात-आंध्रात बटाट्यासोबत रश्श्यात भाजी, ओरिसा व बंगालमध्ये मसाल्यांसह खास पाककृती. आपल्या देशाशिवाय फिलिपीन्स, थायलंड, म्यानमार येथेही शेवग्याच्या शेंगा, पाने व पानांची पूड विविध पदार्थांत वापरली जाते.



No comments:
Post a Comment