अमित शहांच्या हस्ते २० लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे आज वितरण होणार - चेतनसिंह केदार सावंत
दहा लाख घरकुल लाभार्थ्यांना एका क्लिकद्वारे देणार दीड हजार कोटी रुपये देण्यात येणार
सांगोला (तालुका प्रतिनिधी): प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता सुमारे १५०० कोटी रुपये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते एका क्लिकवर दिला जाणार आहे. तसेच यावेळी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण होणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.
आज शनिवारी २२ फेब्रुवारी पुण्यातील बालेवाडीमधील शिवछत्रपती क्रीडा संकुलात केंद्रीय अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत २० लाख घरकुल लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच १० लाख घरकुल लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचे वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम, नगरविकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती सुजाता सौनिक, पंचायत राज विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले उपस्थित राहणार आहेत.
या राज्यस्तरीय कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात लाभार्थ्यांना मंजूरी पत्र वितरण करण्यात येणार असून त्याबरोबरच प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण टप्पा २ मधील राज्यातील १० लाख लाभार्थ्यांना एका क्लिकवर पहिला हप्ता वितरित करण्यात येणार आहे. एकही नागरिक बेघर राहणार नाही यासाठी महायुतीचे सरकार कटिबध्द असल्याची ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.



No comments:
Post a Comment