Recent Tube

Breaking

Thursday, August 22, 2024

सांगोला शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २ कोटींच्या निधीची तरतूद करावी



सांगोला शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासाठी २ कोटींच्या निधीची तरतूद करावी 


मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांची अजितदादा पवार यांच्याकडे आग्रही मागणी ; अजितदादांचा सकारात्मक प्रतिसाद 


सांगोला ; तालुका प्रतिनिधी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचे नेतृत्व करून मरगळलेल्या मराठी मनात अस्मितेची फुंकर भरणाऱ्या लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे सांगोला शहरात देखणे आणि भव्य-दिव्य स्मारक व्हावे ही अनेक वर्षांची मागणी आहे. राज्य सरकारने या स्मारकासाठी २ कोटी रुपयांची तरतूद करावी अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे. 


सांगोला शहरातील तमाम समाज बांधवांची अनेक वर्षांपासून असणारी ज्वलंत मागणी लक्षात घेऊन राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष दिपकआबा साळुंखे पाटील यांनी बुधवार दि 21 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मंत्रालयात भेट घेऊन लेखी मागणीचे निवेदन दिले. लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत आणि संपूर्ण मराठी साहित्य विश्वात महत्वपूर्ण योगदान आहे. आपल्या साहित्य विश्वातून आणि प्रबोधनात्मक पोवाड्यातून त्यांनी जनजागृती करून खऱ्या अर्थाने वंचित व पीडित वर्गाला स्वाभिमानाने जगण्याची ऊर्जा दिली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे सांगोला शहरात भव्य दिव्य स्मारक झाल्यास अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याची येणाऱ्या पिढीला स्मरण राहील आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कार्यापासून तरुणांना प्रेरणा मिळेल असा आशावाद मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केला. 

दरम्यान सांगोला शहरातील तमाम समाज बांधवांच्या ज्वलंत भावना लक्षात घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही मा. आम. दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या या मागणीबाबत सकारात्मक प्रतिसाद दर्शवत लवकरच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारकासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे शहरातील समाज बांधवात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

No comments:

Post a Comment