सांगोला येथे ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचे जंगी स्वागत.
सांगोला/प्रतिनिधी ओबीसी प्रवर्ग समाजात विखुरला गेला आहे. सामाजिक मेळाव्यात तो जसा एकवटतो तसा ओबीसी म्हणून एकवटत नाही. ओबीसींनी सामाजिक ओळख निर्माण न करता ओबीसी म्हणून ओळख निर्माण केली तरच आरक्षण वाचेल.आरक्षण वाचवण्यासाठी विधानसभेत ओबीसीचे १०० आमदार निवडून आले पाहिजेत. यासाठी सर्वच पक्षाकडे उमेदवारी देण्याबाबत आग्रह धरावा. यासाठी ओबीसीला मतदान केले पाहिजे. जो पक्ष ओबीसीचा उमेदवार देणार नाहीत त्यांच्याशी फारकत घ्यावी.
असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.वंचित बहुजन आघाडीच्यावतीने काढण्यात आलेल्या आरक्षण बचाव यात्रेनिमित्त वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर सांगोला येथे आले होते.त्यावेळी ते बोलत होते
राजकीय वाद असेल तर ठीक आहे, मात्र ओबीसीने मराठा समाजाच्या दुकानात जायचं नाही आणि मराठा समाजाने ओबीसीच्या दुकानात जायचं नाही याची व्याप्ती वाढली तर खूप चिंताजनक परिस्थिती निर्माण होईल, तसेच जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्याची मागणी आहे. मुख्यमंत्री यांनी राज्यातील सर्व पक्षांना यावर भूमिका मांडण्यास सांगितले. परंतु भूमिका न घेता त्याला फाटे फोडण्यास सुरूवात केली. ओबीसी आणि मराठा यामध्ये दरी पडली आहे. यामध्ये कोणी ठिणगी टाकली तर वणवा पेटेल. याचा फायदा राजकीय पक्ष घेऊ शकतो. हा वणवा पेटू नये म्हणून आम्ही संपूर्ण राज्यभर ओबीसी आरक्षण बचाव यात्रा सुरू केली असल्याचे मत वंचित बहूजन आघाडीचे राष्ट्रीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.
पुढे बोलताना आंबेडकर म्हणाले की, आरक्षण हे जे तत्व आहे, ते तत्व सर्वांनाच मान्य होते.पण आता सुप्रिम कोर्टापासून हायकोर्टापर्यंत आणि काही संघटनांनी आरक्षणच संपविण्याची मागणी केली आहे. आम्हाला नाही, तर कोणालाच नाही अशी भूमिका आरक्षण विरोधी संघटनांनी घेतलेली आहे. या माणीचा फटका ओबीसी आरक्षणाला बसणार आहे. एस.सी. आणि एस.टी. यांचे आरक्षण हे संविधानाने दिलेले आरक्षण आहे. ते काढून घ्यायचे असेल तर संविधानामध्ये संशोधन झाले पाहिजे. संशोधन झाले तरच एस.सी. एसटी. प्रवर्गाचे आरक्षण काढता येईल. असेही यावेळी बोलताना त्यांनी सांगितले.
तसेच मागील लोकसभेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्यावतीने आम्ही संशोधन करू अशी घोषणा दिली. त्यासाठी ४०० च्या वर जागा जिंकू असे सांगितले. परंतु त्याचा फटका भाजपाला बसला. कसेबसे भाजपाचे सरकार आले. शपथविधी घेताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संविधान आपल्या कपाळाला लावले आणि हे संविधानच माझे आहे आणि मीच त्याला वाचविणार असल्याचा भास जनतेत निर्माण केला आहे. त्यामुळे संविधानाला कोणी हात लावू शकत नाही हे स्पष्ट आहे. त्यामुळे एस.सी., एस.टी. प्रवर्गाला मिळणारे आरक्षण हे कायम आहे.त्यामुळे ओबीसींनी सामाजिक ओळख निर्माण न करता ओबीसी म्हणून ओळख निर्माण केली तरच आरक्षण वाचेल अशी भूमिका अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली.
यावेळी जय मल्हार क्रांती संघटना, नाभिक सेवा समाज मंडळ, रामोशी समाज बेडर संघटना,कोळी महासंघ, तसेच मुस्लिम व धनगर समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणावर या आरक्षण बचाव यात्रेस पाठिंबा दिला. यावेळी राज्याचे प्रवक्ते इम्तियाज नदाफ, राज्याचे उपाध्यक्ष प्राध्यापक सोमनाथ साळुंखे, सोलापूर जिल्हा अध्यक्ष मडीखांबे , माढा विभाग जिल्हाध्यक्ष राहुलजी चव्हाण, महासचिव विशाल नवगिरे, लालासाहेब मुलाणी, वैभव भंडारे,रवी सर्वगोड ,सांगोला तालुकाध्यक्ष विनोद उबाळे, तसेच सांगोला तालुक्यातील ओबीसी बांधव, वंचित बहूजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment