नैसर्गिक जीवनशैलीने कॅन्सरला प्रतिबंध करणे शक्य- प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे.
रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614
मंगळवार, दिनांक 17 ऑक्टोबर 2023 रोजी नारीशक्ती महिला ग्रामसंघ नाझरे, तालुका सांगोला व प्रथम युवा भवन, नाझरे यांचे संयुक्त विद्यमाने "महिलांमधील कर्करोग: कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय" याविषयी जनजागृती करण्याच्या दृष्टीने व्याख्यानाचे आयोजन केले होते. सदर व्याख्यानास प्रमुख मार्गदर्शक म्हणून सांगोला महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक व कॅन्सर संशोधक डॉ. प्रकाश अरुण बनसोडे यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
हे नाझरे येथील वीरभद्र मंदिरासमोरील सभागृहात येथे दुपारी 02.00 वाजता संपन्न झाले. सदर कार्यक्रमास नारीशक्ती महिला ग्राम संघाच्या अध्यक्षा सौ. सुलभाताई देशपांडे, बहुजन नेते व प्रथम एज्युकेशन फाउंडेशनचे मा. बापूसाहेब ठोकळे तसेच नाझरे गावातील मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सुलभाताई देशपांडे होत्या. प्रा. डॉ. प्रकाश बनसोडे यांनी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व टाटा कॅन्सर हॉस्पिटल, खारघर, नवी मुंबई, यांच्या सहकार्याने महिलांमधील कर्करोगावर उपयुक्त असणाऱ्या सुरक्षित व प्रभावी औषधांचा शोध याविषयी महत्त्वाचे संशोधन केले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी कॅन्सर विषयक जनजागृती व्याख्याने दिली आहेत.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख सौ मुलांनी मॅडम यांनी करून दिली. सदर व्याख्याना मध्ये डॉ. बनसोडे यांनी महिलांमधील स्तनांचा, गर्भाशयाच्या मुखाचा व बीजाशयाचा कर्करोग तसेच फुफ्फुसाचा कर्करोग, तोंडाचा कर्करोग, रक्ताचा कर्करोग, डोक्याचा व मानेचा कर्करोग या विविध प्रकारच्या कर्करोगांबाबत संभाव्य कारणे, प्रथमदर्शी लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाय याबाबत अतिशय सोप्या भाषेत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. कॅन्सर होण्यासाठी संभाव्य कारणे विशद करत असताना त्यांनी अनुवंशिक घटक, त्याचप्रमाणे रासायनिक, भौतिक व जैविक कार्सिनोजेन, कीटकनाशके, उर्जादायी किरणे, प्रदूषण ओनकोजेनिक विषाणू अशा अनेक कॅन्सरला कारणीभूत ठरणाऱ्या अंतर्गत व बाह्य घटकांबाबत दैनंदिन जीवनातील अनेक सोपी उदाहरणे देत बहुमूल्य मार्गदर्शन केले. सदर व्याख्यानात त्यांनी विविध कर्करोगांमधील लक्षणे जसे की भूक न लागणे, वजन झपाट्याने कमी होणे, तीन आठवड्यांपेक्षा जास्त खोकला राहणे, अवयवांमध्ये जडपणा व शिथिलता जाणवणे, तोंडामध्ये लालसर पांढरे चट्टे येणे, विविध अवयवांमधून रक्तस्त्राव होणे, इत्यादी अनेक लक्षणांची विस्तृतरित्या माहिती दिली.
कर्करोग टाळण्यासाठी आवश्यक नैसर्गिक जीवनशैलीचा अवलंब, निरोगी राहण्यासाठी व्यायाम व संतुलित आहार, पुरेशी झोप, तंबाखू, धूम्रपान, दारू, गुटखा, खेनी, पान मसाला, मशेरी इत्यादीचे सेवन व तपकीर ओढणे यासारख्या व्यसनांना प्रतिबंध, मेद किंवा वसायुक्त पदार्थांना टाळणे, रजो निवृत्तीनंतर होणारे संप्रेरक बदल व घ्यावयाची काळजी, लसीकरण व कॅन्सर निदान याबाबत दैनंदिन जीवनातील विविध उदाहरणे देत महत्त्व स्पष्ट केले. बापूसाहेब ठोकळे यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन या संस्थेच्या वतीने ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार तरुणांना साठी उपलब्ध केलेल्या विविध संधी बाबत मार्गदर्शन केले. तसेच नर्सिंग कोर्सच्या उपकरणांबाबत उपस्थितांना माहिती दिली.सदर कार्यक्रमाप्रसंगी सौ. मुलाणी मॅडम यानीबआपले मनोगत व आभार व्यक्त केले. प्रमुख संयोजिका म्हणून सौ. सुवर्णा जावीर यांनी काम पाहिले. समारोप प्रसंगी प्रश्न उत्तरांचे सत्र पार पडले. या सत्रामध्ये महिलांनी आरोग्य विषयक विविध प्रश्न विचारत सक्रियपणे सहभाग नोंदविला. कार्यक्रमास नाझरे पंचक्रोशीतील महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.



No comments:
Post a Comment