महूद येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने चला जाणूया नदीला उपक्रमा अंतर्गत कासाळगंगा नदी संवाद कार्यक्रम संपन्न
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक कार्य विभाग यांचे तर्फे महूद (ता. सांगोला) येथे आज दि.३ रोजी चला जाणूया नदीला उपक्रमा अंतर्गत कासाळगंगा नदी संवाद हा कार्यक्रम वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत पार पडला.यावेळी आंतरराष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्र सिंह,आमदार शहाजीबापू पाटील, दीपकआबा साळुंखे पाटील, प्रशांत परिचारक, ब्रँड अँबेसिडर चिन्मय उदगीरकर, शेकापचे बाबासाहेब देशमुख, तहसीलदार अभिजीत पाटील,गटविकास अधिकारी आनंद लोकरे,सरपंच संजीवनी लुबाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रथम कासाळगंगा कलशाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री सुधीर मुनगंटीवार असे म्हणाले की, ज्या नदीला आम्ही माता म्हणतो. जगामध्ये इतर कोणत्याही देशांमध्ये नदीला माता मानत नाहीत.आपण मात्र ओठांनी, शब्दांनी माता मानायचं ! आणि त्या मातेला प्रदूषित करायचे असा पराक्रम करायचा. त्या मातेला त्रास देण्यामध्ये पुरुषार्थ समजायचा ही मात्र मनुष्याला न शोधणारी कृती आपण करायची.ज्या नदीच्या किनाऱ्यावर आपलं पोषण झाले. रक्षण झालं. त्यात नदीच्या किनाऱ्यावर ज्या नदीनं आपलं रक्षण केलं. जीवदान दिलं. त्याच नदीच शोषण करणे हा आमचा मोक्षाचा मार्ग आहे. असे समजायचे हे मानवाला न शोभणारी कृती करायची. हे कुठेतरी थांबले पाहिजे.
पूर्वी वडील मुलांना म्हणायचे की ,अरे पैसे तू पाण्यासारखे खर्च करू नको. पण आता आमच्या पराक्रमाने अशी म्हणायची वेळ आली आहे की, पाणी पैशासारखे खर्च करू नको असे सांगावे लागेल अशी अवस्था आता झाली आहे.
यापुढे बोलताना असे म्हणाले की "आजचा आमदार" हा उद्याचा नामदार" होतो. नंतर तो "दारोदार होतो" हे पद कोणाचेही चिरंजीव असू शकत नाही .पण ईश्वराने दिलेली संपत्ती ही चिरंजीव आहे. या संपत्ती संदर्भात चिंतन व्हावे, चर्चा व्हावी. मंथन व्हावे यासाठी आपण चला जाणूया नदीला हा उपक्रम माननीय राजेंद्र सिंहजी यांचे सूचनेनुसार सुरू केला आहे.चला जाणुया नदीला या उपक्रमाची अंतिम गुणपत्रिका कधी पूर्ण होणार तर आमदार शहाजी बापू पाटील यांच्या भाषेमध्ये सांगायचे झाल्यास "काय झाडी" काय डोंगर... काय हॉटेल ....काय ओढा... काय कासळगंगा सार कसं ओके मध्ये आहे. तेव्हा या कार्यक्रमाची यशोगाथा झाली असे म्हणता येईल.
यावेळी आंतरराष्ट्रीय जलतज्ञ राजेंद्र सिंहजी, ब्रँड अँबेसिडर चिन्मय उदगीरकर, शहाजीबापू पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी 27 गावातील सरपंच, उपसरपंच ,प्रतिष्ठित नागरिक, महिलावर्ग ,विद्यार्थी, सांगोला,पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments:
Post a Comment