Recent Tube

Breaking

Sunday, September 11, 2022

मैदानातला खेळ जगण्यातही जिंकता आला पाहिजे : आमदार शहाजी बापू पाटील



मैदानातला खेळ जगण्यातही जिंकता आला पाहिजे : आमदार शहाजीबापू पाटील


सांगोला: मैदानातल्या खेळात प्रचंड ऊर्जा असते,आपल्या जगण्याला खऱ्या अर्थाने घडवण्याचे काम मैदान करत असते.मैदानावरचा खेळ वयाच्या विशिष्ट टप्प्यात संपणार आहे परंतु जीवनाचा खेळ हा आपल्या श्वासापर्यंत चालणार आहे.कधी-कधी मैदानातला खेळ आपण हरवू पण जीवनातला खेळ हरता कामा नये. मैदानात मिळालेला जिंकण्याचा प्रचंड आत्मविश्वास हाच तुम्हाला जगण्यात उपयोगी पडतो,म्हणूनच मैदानातला खेळ जगण्यातही जिंकता आला पाहिजे असे प्रतिपादन सांगोला तालुक्याचे लोकप्रिय आमदार शहाजी बापू पाटील यांनी केले.



सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला,महा.बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या ४१ व्या स्मृती समारोह निमित्त व जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय कुमार-कुमारी अजिंक्यपद बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन आज सांगोला विद्यामंदिर सांगोला येथील प्रांगणात संपन्न झाले. यावेळी उद्घाटक म्हणून आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अक्कलकोटचे भाजपाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी ,सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके,महा बास्केटबॉल असोसिएशनचे सचिव शत्रुघ्न गोखले, महानंदा दूध संघाचे संचालक चंद्रकांत देशमुख, स्वामी समर्थ सहकारी सूतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, खजिनदार जयंत देशमुख, सांगोला तालुका उच्च शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाबुराव गायकवाड ,उद्योगपती नितीनजी बिजरगी,शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरचे स्पोर्ट डायरेक्टर शरद बनसोडे,आंतरराष्ट्रीय पंच अमर कानडे,भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हरिभाऊ पाटील, लायन नरेंद्र गंभीरे,सुभाष मुनाळे , माजी नगराध्यक्ष रफिकभाई नदाफ, उद्योगपती सिद्धार्थ झपके, माजी नगराध्यक्ष सुहास होनराव, विलास क्षीरसागर,ज्येष्ठ विधीज्ञ उदय बापू घोंगडे, सुधीर उकळे, उद्योगपती नागेश तेली, अनिल जाधव,ऋषिकेश माडीवाले, प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांच्यासह सर्व क्रीडा प्रेमी उपस्थित होते.सर्वप्रथम कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. ओपनिंग सेरेमनी साठी सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत विविध नृत्य सादर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी नृत्य दिग्दर्शन मकरंद अंकलगी,अमोल महिमकर,केशव निसाळ यांनी केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांनी केले.



पुढे बोलताना उद्घाटक शहाजी बापू पाटील म्हणाले की ,"उद्घाटक म्हणून मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल संयोजकांचे मनःपूर्वक आभार मानतो. आजच्या या क्षणांमुळे मला माझ्या कॉलेजच्या जीवनाची आठवण झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून विविध जिल्ह्यातील संघ या ठिकाणी आले आहेत.ही तरुणाई पाहिल्यानंतर वाटतं की देवाने मला का म्हातारं केलं... बास्केटबॉल खेळाचे मला नेहमीच कौतुक वाटायचं, समोरच्या खेळाडूला चकवा देण्याचं काम बास्केटबॉलचा खेळाडू करतोय, खरंतर आम्ही पण चकवा देतोय.तुमचा मैदानावरचा एक चकवा चुकला तर तुम्हाला लगेच दुसरा चकवा द्यायला मिळतो पण आम्हाला मात्र तसं नाही,आमचा एक चकवा चुकला तर पाच वर्षे घरी बसावं लागतं.जीवनात गरुड पंखाने झेप मारा.जगाच्या पाठीवर अस कोणतंच काम नाही ज्यात यश मिळणार नाही.आपली नियत, व अंतकरण साफ असलं पाहिजे.जी गोष्ट मी करतोय ती प्रामाणिकपणे करतोय याचा विश्वास असायला हवा. हा खेळ कुठेतरी संपणार आहे पण जीवनाचा खेळ हा शेवटपर्यंत चालणार आहे.या मैदानावरची ऊर्जा,इथली झेप तुमच्या जीवनात उतरली पाहिजे.स्वप्न बघताना घोटाळा करू नका. डॉक्टरच स्वप्न पाहिलं तर असं स्वप्न बघा की डॉक्टर म्हणून मी संपूर्ण जगात प्रसिद्ध होईल.अमेरिकेत जाऊन मी ऑपरेशन करून येईल असं स्वप्न बघा. तुमची शक्ती हीच या देशाची शक्ती आहे.जगाच्या पाठीवर तरुणांची शक्ती असणारा कोणता देश असेल तर तो केवळ भारत देशच आहे. आम्हाला आमचा भारत देश काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतचा उज्वल देश बघायचा आहे.तो तुमच्यात मला दिसेल. महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून तुम्ही आला आहात. तुमच्यामुळे या दुष्काळी तालुक्यात पाऊस पडायला लागला.सांगोला सोडताना तुमचं काळीज भरून येईल एवढी माया,एवढं प्रेम आम्ही तुम्हाला देऊ.स्पर्धेत जिंकणाऱ्याला हात जोडून सांगतो,हरणारा होता म्हणून तुम्ही जिंकला आहात.त्यामुळे हरणाराला कधीच अंतर देऊ नका..."आम्ही सध्या गुहाटीत आहोत..काय झाडी ..काय डोंगर..काय हॉटेल..समदं काय ओकेच आहे.." या डायलॉग ने त्यांनी भाषणाचा शेवट केला.

यावेळी बोलताना महानंदा दूध डेरी चे संचालक चंद्रकांत देशमुख यांनी स्पर्धेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल विद्यामंदिर परिवारातील सर्वांना धन्यवाद दिले व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.सर्वप्रथम कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या तैलचित्रास कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या शुभहस्ते पुष्पहार समर्पित करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन क्रीडा शिक्षक सुनील भोरे ,प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले तर आभार प्राचार्य भीमाशंकर पैलवान यांनी मांनले. उद्घाटन सोहळ्यासाठी सोलापूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशन सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनचे सर्व पदाधिकारी,सर्व पंच,खेळाडू, पत्रकार ज्येष्ठ नागरिक,विद्यामंदिर परिवारातील सर्व प्राचार्य, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सांगोला तालुक्यातील असंख्य क्रीडाप्रेमी उपस्थित होते.

स्पर्धेचे अतिशय सुंदर नियोजन करण्यात आले आहे.महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून सोलापूर जिल्ह्यातील सांगोला सारख्या तालुकास्तरीय ठिकाणावर आपण सर्वजण एकत्रित झाला आहात, आपणा सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करत आहोत.विद्यामंदिर परिवारातील सर्व सदस्यांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो.अतिशय सुंदर नियोजन या स्पर्धेचे करण्यात आलेआहे. सर्व स्पर्धकांना मी मनापासून शुभेच्छा देतो. हार जीत हा स्पर्धेचा भाग असतो.आपण खेळात सहभागी होता हीच सर्वात मोठी आनंदाची बाब आहे. क्रीडा क्षेत्रासाठी नरेंद्र मोदी यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला आहे.मेजर ध्यानचंद यांच्या नावाने देशातील पहिले युनिव्हर्सिटी उत्तर प्रदेशात सुरू केले आहे. आपण आपला खेळ प्रामाणिकपणे व सचोटीने करावा असे म्हणत त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या...

आमदार सचिन कल्याण शेट्टी अक्कलकोट

१९८२ सालापासून आजतागात या बास्केटबॉल स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे आयोजित करत आहोत. कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने महा. बास्केटबॉल असोसिएशन व सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही या अजिंक्यपद स्पर्धा भरवल्या आहेत. आमदार शहाजीबापू पाटील यांच्या आमदार फंडातून या स्पर्धेसाठी भरीव रक्कम दिल्यामुळे आम्ही या स्पर्धा यशस्वीरित्या भरवु शकत आहोत. पाऊस व बास्केटबॉल स्पर्धा यांचं एक अनोखा नातं आहे.गेल्या ४० वर्षांपासून हे नातं आम्ही अनुभवतो आहे.या पावसात होणाऱ्या स्पर्धा तितक्याच चुरशीच्या होतील यात शंका नाही.सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ व महा. बास्केटबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होत असलेल्या या स्पर्धेचा पाहुणचार राज्यातून आलेल्या सर्व स्पर्धकांना निश्चितपणे आवडेल याचा मला विश्वास वाटतो.- 

प्रा. प्रबुद्ध चंद्र झपके

(अध्यक्ष सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ)

No comments:

Post a Comment