सोनंद पंचायत समिती गणातून डॉ. सौ. स्वाती परेश खंडागळे यांची उमेदवारी जाहीर
सांगोला प्रतिनिधी : सांगोला तालुक्यातील सोनंद पंचायत समिती गणातून डॉ. सौ. स्वाती परेश खंडागळे यांनी उमेदवारी जाहीर केली असून, महिलांच्या सक्षमीकरणासह सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व्यापक विकासात्मक अजेंडा मांडला आहे.
डॉ. खंडागळे यांनी महिलांसाठी विशेष कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. महिलांसाठी मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे, महिलांचे बचतगट स्थापन करणे तसेच महिलांना उद्योग-व्यवसाय सुरू करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संधी उपलब्ध करून देण्यावर भर दिला जाणार आहे.
यासोबतच गणातील सर्व नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जातील. सोनंद पंचायत समिती एक कुटुंब म्हणून कार्य करेल, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सामुदायिक विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे.
रस्ते, वीज (लाईट) आणि पाणी या मूलभूत सुविधांशी संबंधित समस्या कायमस्वरूपी दूर करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपल्या सर्वांच्या सेवेसाठी आमचे संपूर्ण कुटुंब 24 तास प्रयत्नशील राहील, असे आश्वासन देत डॉ. स्वाती खंडागळे यांनी विकास, सेवा आणि विश्वास या त्रिसूत्रीवर काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
त्यांच्या या जाहीरनाम्यामुळे महिलांमध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून येत असून, सोनंद पंचायत समिती गणात निवडणूक वातावरण तापू लागले आहे.



No comments:
Post a Comment