शक्तिपीठ महामार्गाचा मूळ आराखडा कायम ठेवावा; आराखड्यात कोणताही बदल न करता कामे पूर्णत्वास न्यावीत – आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
सांगोला: महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शक्तिपीठ महामार्गाच्या मूळ आराखड्यात (Alignment) कोणताही बदल न करता, शक्तीपीठ महामार्गाचे काम त्वरीत पूर्णत्वास न्यावीत, अशी ठाम मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेला शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प माझ्या सांगोला, पंढरपूर तालुक्यातून जात असून हा प्रकल्प राज्यातील तीर्थक्षेत्रे, औद्योगिक केंद्रे तसेच ग्रामीण भाग यांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा दळणवळण प्रकल्प आहे. या महामार्गामुळे राज्याच्या आर्थिक, सामाजिक व धार्मिक पर्यटन विकासाला मोठी चालना मिळणार आहे
सदर शक्तीपीठ महामार्गाचा मूळ आरेखण (Alignment) निश्चित करताना तांत्रिक, भौगोलिक तसेच लोकहिताच्या सर्व बाबींचा सखोल अभ्यास करूनच तो मंजूर करण्यात आलेला आहे. तथापि, सद्यस्थितीत मूळ आरेखणामध्ये बदल होण्याबाबत चर्चा होत असल्याचे निदर्शनास येत आहे. अशा प्रकारचा कोणताही बदल झाल्यास शेतकरी, स्थानिक नागरिक तसेच प्रकल्पाच्या एकूण खर्च व कालमयदिवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.
या महामार्गामुळे संबंधित भागातील दळणवळण सुलभ होऊन औद्योगिक गुंतवणूक, रोजगारनिर्मिती तसेच पर्यटन विकासास मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल, याची मला पूर्ण खात्री आहे. तरी सदर शक्तीपीठ महामार्गाच्या मूळ आरेखणामध्ये कोणताही बदल न करता जिएमआर कंपनीमार्फत नियोजित वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने काम पूर्ण करून हा महामार्ग लवकरात लवकर कार्यान्वित करण्यात यावा असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
*चौकट: मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरच पुढाकार — आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांची ठाम भूमिका*
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्तीपीठ महामार्गासंदर्भात घोषणा केल्यानंतर लगेचच आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मुंबईत भेट घेऊन १५ दिवसापूर्वी या महामार्गाच्या मूळ आराखड्यात कोणताही बदल न करण्याची ठाम मागणी केली होती. आराखड्यात बदल केल्यास परिसरातील औद्योगिक विकास, पर्यटनवाढ आणि रोजगारनिर्मितीची संधी कमी होईल. त्यामुळे मूळ आराखडा कायम ठेवूनच काम तात्काळ सुरू करावे, अशी मागणी काल पुन्हा समक्ष भेटून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्याकडे केली.



No comments:
Post a Comment