Recent Tube

Breaking

Sunday, September 28, 2025

भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी



भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी



सांगोला (प्रतिनिधी): सांगोला तालुक्यात अतिवृष्टी व पुरामुळे प्रचंड प्रमाणात नुकसान झालेले शेती पिकांचे, जनावरांचे, घरांचे व व्यावसायिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून राज्य शासन संकटकाळात पूरग्रस्तांच्या पूर्णपणे पाठीशी असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाणार असल्याची ग्वाही भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. यावेळी तहसीलदार संतोष कणसे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पूरग्रस्त नागरिकांनी अशा संकटाच्या काळात धीर धरावा, असे आवाहनही त्यांनी केले.



सांगोला तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे फळबागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतातील पिके माती वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी वाढेगाव,आलेगाव, मेडशिंगी, बुरलेवाडी, वाणीचिंचाळे, आगलावेवाडी, कडलास या पूरग्रस्त भागाची पाहणी करून ग्रामस्थांशी संवाद साधला. अचानक आलेल्या पावसानं शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी घुसले. पेरणी झालेल्या शेतातील पिके वाहून गेली, शेकडो एकरातील पिके आणि शेती पूर्णपणे वाहून गेली. शेतातील सिंचन साहित्य, ड्रीप, तुषार संच पूर्णपणे वाहून गेले. सिंचनासाठी उभ्या करण्यात आलेले सोलार, विजेचे खांब वाहून गेले. सर्व परिसरातील रस्ते उखडून गेले आहेत. खरडून गेलेली शेती पुन्हा पेरणीयोग्य होण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना जमीन दुरुस्तीसाठी वेगळी मदत करणे आवश्यक आहे.  



       अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यातील गावांमध्ये शेतपीक, फळपीक, बंधारे, रस्ते, घरे, पुलांचे नुकसान झाले आहे. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून नुकसानीच्या मदतीपासून एकही नागरिक वंचित राहणार नाही. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनातर्फे सर्वोतोपरी मदत दिली जाईल अशी ग्वाही भाजप जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी नुकसानग्रस्त शेतकरी व नागरिकांना दिली. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या शेत पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या शेतपिकांचे, घरांचे तसेच सार्वजनिक मालमत्तांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनास सादर करण्याच्या सूचना प्रशासनास त्यांनी दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment