१० एप्रिल पासून माण व कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येणार - चेतनसिंह केदार सावंत
सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोला तालुक्यातील रब्बी हंगामातील पिकांना जीवदान देण्यासाठी तसेच पाणी टंचाई दूर करण्यासाठी येत्या १० एप्रिल पासून टेंभू, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करून माण व कोरडा नदीवरील बंधारे भरून देण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात झालेल्या बैठकीत सांगोला तालुक्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी तात्काळ टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रालयात जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दालनात जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्यासह अधिकारी व आमदार उपस्थित होते. सध्या सांगोला तालुक्यात भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. नदी, तलाव,बंधारे ओढे, नाले कोरडे पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे शेतकरी चांगलेच धास्तावले आहेत. पाणी प्रश्न मार्गी लावण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली जात आहे. त्यामुळे या बैठकीत सांगोला तालुक्यातील भीषण पाणी टंचाईवर चर्चा करण्यात आली. येत्या १० एप्रिल पासून सांगोला तालुक्यासाठी टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. टेंभू योजनेतून जुनोनी व बुद्धेहाळ तलाव भरून माण नदीत सोडून बलवडी ते मेथवडे पर्यंतचे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून देण्यात येणार आहेत. तसेच म्हैसाळ योजनेतून घेरडी तलाव भरून कोरडा नदीवरील सर्व बंधारे भरून देण्यात येणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.
टेंभू व म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू होणार असल्याने सांगोल्यातील जनतेला, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले. टेंभूचे पाणी माण नदीत सोडण्यात येणार असल्याने बलवडी, वझरे, नाझरे, चिणके, अनकढाळ, वाटंबरे, कमलापूर, वासुद, अकोला, कडलास, वाढेगाव, बामणी, सावे, मांजरी, देवळे, मेथवडे या गावांसह अन्य १५ ते २० गावांना फायदा होणार असून या पाण्यामुळे सिंचनाचा प्रश्न सुटणार आहे. टेंभूच्या आवर्तनाचे पाणी सर्व गावांना व्यवस्थित देऊन माण नदीवरील सर्व बंधारे भरण्याचे योग्य नियोजन करून पाणी सोडण्याच्या सूचना टेंभूच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली.



No comments:
Post a Comment