छत्रपती शिवरायांच्या स्मारक उभारणीचा हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडणारा पहिलाच आमदार डॉ बाबासाहेब देशमुख.
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या विधानसभेतील पहिल्याच भाषणाने वेधून घेतले सर्वांचे लक्ष
छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारकासंदर्भात व तालुक्यातील प्रलंबित विकास कामांवर उठवला आवाज
सांगोला(प्रतिनिधी):-अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारक उभारणी संदर्भात,आर्थिक विकास महामंडळांचा निधी,सांगोला तालुक्यातील ट्रामा केअर त्याचप्रमाणे आरोग्य विभागासंदर्भातील सामाजिक व सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचे प्रश्न मांडून सांगोला विधानसभा मतदारसंघाचे नवनियुक्त आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभेतील पहिल्याच भाषणात सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवून थेट विधानमंडळात प्रवेश केला.त्यानंतर काल बुधवार दि.18 डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्यादांच विधानसभेत भाषण केले. नागपूर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावर आपले विचार व्यक्त करताना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी पहिल्याच भाषणात वक्तृत्त्वाची चुणूक दाखवली.
यावेळी बोलताना आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले, दि.9 डिसेंबर 2024 रोजी मा.राज्यपाल महोदयांनी मध्यवर्ती सभागृहात केलेल्या अभिभाषणावर चर्चा करण्यासाठी मी उभा आहे. छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले, छ.शाहू महाराज यांच्यासारख्या अनेक थोर महापुरुषांनी घालून दिलेल्या उच्च आदर्शांचे पालन करण्यासाठी मी कटिबध्द आहे. परंतू अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय स्मारक बांधण्यासाठी 13 विभागांनी ना हरकतप्रमाण पत्र दिले असून त्याचे भूमीपूजनही झाले आहे परंतू या स्मारकाची उभारणी करण्यासंबंधी राज्यपालांच्या अभिभाषणात उल्लेख नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
तसेच शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यामातून सांगोला मतदारसंघाचे 11 वेळचे आमदार स्व भाई. गणपतराव देशमुख यांचे स्मारक विधीमंडळाच्या आवारात उभारण्याची मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी केली, यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मागणी केली होती. अशी आठवणदेखील आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सभागृहात सांगितली.
मागच्या 5 वर्षामध्ये लोणारी समाज, होलार समाज, रामोशी समाज आर्थिक विकास महामंडळाची घोषणा झाली. या महामंडळांना लवकरात लवकर निधी वर्ग करुन या समाजांना दिलासा देवून आर्थिक सहकार्य करावे, त्याचप्रमाणे स्व.गणपतराव देशमुख यांच्या मागणीनुसार सांगोला शहरात भव्य दिव्य ट्रामा केअर उभे केले आहे ते ट्रामा केअर लवकरात लवकर सुरु करा, त्याचप्रमाणे सांगोला तालुक्यात आरोग्य विभागात अपुरा कर्मचारी वर्ग असल्याने आरोग्य सेवा मिळण्यात अडथळे येत आहेत. आरोग्य केंद्रातील रिक्त पदे लवकरात लवकरात भरावीत, अशीही मागणी केली.
आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी बुधवारी विधानसभेत फुल फॉर्ममध्ये दिसले. डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी सर्वसामान्य जनतेच्या हिताचे प्रश्न उपस्थित केले. स्व.गणपतराव देशमुख यांनी पदाचा वापर कधीही स्वत:साठी न करता सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केला.त्याचप्रमाणे स्व.गणपतराव देशमुख यांचे नातू आमदार डॉ.बाबासाहेबांनी तीच परंपरा पुढे कायम ठेवली असल्याची चर्चा विधानसभा परिसरात सुरु होती.
चौकट:- निवडणुकीच्या कालावधीत लोणारी समाज, होलार समाज, रामोशी समाज आदी समाजाविषयी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन दिल्याच्या घोषणा मागील सरकारने केल्या होत्या. त्या निधीसंदर्भात आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला.दरम्यान सदर तीन समाजाच्या आर्थिक महाविकास मंडळासंदर्भात पहिल्याच अधिवेशनामध्ये आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी मुद्दा उपस्थित करुन सर्व समाजाचे हित जोपासले आहे. यावर आता मुख्यमंत्री महोदय आपल्या भाषणात या संदर्भात काय बोलतील याकडे तिन्ही समाजाचे लक्ष लागून राहिले आहे.



No comments:
Post a Comment