आबासाहेबांचा राजकीय वारसदार म्हणणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे: डॉ. अनिकेत देशमुख
यापुढे राजकीय वारसा संदर्भात बोलताना विचार करावा.
सांगोला:- काही लोक म्हणतात आबासाहेबांच्या विचारांचे आम्ही वारसदार आहोत मला त्यांना विचारायचे आहे की आपण स्वतःचा इतिहास तपासावा, आपल्या राजकीय जीवनामध्ये ज्या ज्या पक्षाने, घराण्यांनी आपणास राजकीय पाठबळ दिले, ज्यांना आपण पित्या समान मानले त्यांचे आपण वारसदार होऊ शकला नाही, स्वतःच्या स्वार्थासाठी दररोज पक्ष बदलणाऱ्यांनी यापुढे राजकीय वारसा संदर्भात बोलताना विचार करावा.आपणास व आपल्या कार्यकर्त्यांना आबासाहेबांनी ग्रामपंचायतीपासून पंचायत समिती, जिल्हा परिषद ते थेट विधानभवनापर्यंत पोहोचवले, आपण आबासाहेबांची कशाप्रकारे सेवा केली ते स्व.आबासाहेब, आम्ही कुटुंबिय व सर्व जनता जाणते आहे.आबासाहेब यांनी तालुक्यांसाठी निस्वार्थपणे सबंध आयुष्य घालवले त्यांचा वसा व वारसा पुढे चालण्यासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांना विजयी करावे असे आवाहन शेतकरी कामगार पक्षाचे चिटणीस मंडळाचे सदस्य डॉ. अनिकेत देशमुख यांनी केले.
सांगोला विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडी-इंडिया अलायन्स पुरस्कृत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ. बाबासाहेब आण्णासाहेब देशमुख यांच्या प्रचारार्थ शुक्रवार दि.८ रोजी सांगोला तालुक्यातील मौजे भोपसेवाडी येथे कॉर्नर सभा संपन्न झाली. यावेळी डॉ. अनिकेत देशमुख बोलत होते.
यावेळी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष राजकुमार पवार म्हणाले की, सांगोला तालुक्यातील काँग्रेस पक्ष हा डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. आम्ही डॉ. बाबासाहेब देशमुख यांना विजयी करण्यासाठी जीवाचे रान करणार आहोत.
डॉ.बाबासाहेब देशमुख म्हणाले की, काही लोक नागरिकांना पैशाचे आमिष दाखवून व धमकावून मते मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. गेल्या ५ वर्षात टक्केवारी मिळविण्यासाठी काही कामे हाती घेतली. कामे निकृष्ट करून अमाप माया दोघांनी मिळवली आणि माणसाचे जीवनमान उंचावण्यासाठी आवश्यक असणाऱ्या परंतु त्यांना टक्केवारी न मिळणाऱ्या शिक्षण, आरोग्य, शेती, दुग्ध व्यवसाय याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. वाळू माफिया व अवैध व्यवसाय करणाऱ्यांना पाठबळ दिले त्यामुळे तरुणांना व्यसने लागून शांतता असणारा तालुका अशांत झाला. सर्वसामान्य माणसांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे म्हणून आपले जीवन भयमुक्त जगता यावे, आबासाहेबांचा पुरोगामी विचार टिकावा, तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी २० तारखेला माझ्या नावासमोरील शिट्टी या चिन्हा समोरील बटन दाबून पुन्हा एकदा सांगोला तालुक्यात लाल बावटा फडकवावा असे आवाहन केले.
यावेळी प्रस्ताविकामध्ये महेश बंडगर यांनी स्व. भाई गणपतरावजी देशमुख यांनी भोपसेवाडी गावच्या विकासासाठी पाच समाज मंदिरे, 16 सिमेंट बंधारे, ३ शाळा रस्ते, पाणीपुरवठा योजना, घरोघरी विद्युत पुरवठा अशी अनेक कामे केली असून त्यामधून उतराई होण्यासाठी नेहमीप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख यांना गावातून मोठे मताधिक्य देऊन स्व. आबासाहेबांना श्रद्धांजली अर्पण करूया असे आवाहन केले.
यावेळी सभापती मायाप्पा यमगर, सुनील कोरे, अनिल नरळे, आनंदराव यमगर, बाळू कोरे, तानाजी नरळे, दत्तू माळी, श्रीपती वगरे, बबन गावडे, हरी कोळेकर, काका बंडगर, महादेव वसमळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.



No comments:
Post a Comment