तालुक्यातून जेवढे लीड मिळाले आहे तेवढी झाडे लावण्याचे नियोजन -आमदार डॉ बाबासाहेब देशमुख.
सांगोला, (तालुका प्रतिनिधी) : निवडणुका झाल्या... गुलालाची उधळण, फटाके फोडत मिरवणूकाही झाल्या... नूतन विजयी उमेदवारांचे मोठाले सत्कारही सुरू झाले.. काहींना मुंबईला बोलवण्यात आले आहे. परंतु सांगोल्यातील विजयी उमेदवार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी लगेचच मतदारसंघात जेवढे लीड मिळाले आहे तेवढे झाडे लावण्याचे नियोजन सुरू केले आहे. आमदारकीची शपथविधी झाल्यानंतर लगेचच हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुरु करणार असल्याचे नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
सांगोला विधानसभा मतदारसंघ म्हटले की, डोळ्यासमोर स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचेच नाव येते. विक्रमी एकाच पक्षातून विजयी झालेले स्वर्गीय आबासाहेब राज्यभर प्रसिद्ध होते. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत स्वर्गीय आबासाहेबांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी पुन्हा सांगोला तालुक्यावर लालबावटा फडकविला आहे. पेशाने डॉक्टर असलेले बाबासाहेब यांनी आबासाहेब (स्व. गणपतराव देशमुख) यांच्या निधनानंतर तालुक्यातील शेकाप पक्षामध्ये झालेली नेतृत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी मोठा प्रयत्न केला. सर्वसामान्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन ते सोडविण्याचा प्रयत्न करीत. तसेच मतदारसंघातील प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये त्यांच्या घरापर्यंत जाऊन ते भेटत असत त्यामुळे ते तालुकाभर चर्चितही झाले. स्वर्गीय गणपतराव देशमुख यांचे विचार घेऊन राजकारणात आलेले डॉक्टर बाबासाहेबांनी विधानसभेच्या विजयानंतर लगेचच सामाजिक कामे करण्यावर भर दिला आहे. विजयी झाल्यानंतर लगेचच त्यांनी तालुक्यातून जेवढे लीड मिळाले आहे तेवढे झाडे लावण्याची नियोजन सुरू केले आहे. ज्या गावात जेवढे लीड मिळाले आहे, त्या गावात तेवढे झाडे लावण्याचा त्यांनी संकल्प केला आहे. ज्या गावात लीड मिळाले नाही त्याही गावात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना घेवून वृक्षारोपण करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या वृक्षारोपणाच्या संकल्पवर सध्या सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. मतदार संघात डॉ. बाबासाहेब देशमुख हे 25 हजार 386 मतांनी आघाडी मिळवून विजयी झाले आहेत. तेवढी झाडे ते लगेच लावणार असून ती झाडे जोपासण्यासाठी प्रयत्नही करणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले आहे.
भौतिक विकासबरोबरच सजीवसृष्टी विकासालाही देणार महत्त्व -
मी पेशाने डॉक्टर आहे. तालुक्यातील भौतिक विकास आजपर्यंत होत आला आहे. यापुढे होत राहील त्यासाठी मी प्रयत्नशील राहणारच आहे. परंतु प्रत्येकाने या सजीवसृष्टीलाही महत्त्व दिले पाहिजे. आज या जीवसृष्टीमध्ये वृक्षांना अनन्यसाधारण महत्त्व असून मी वृक्ष लागवड चळवळ हाती घेतली आहे. तालुक्यात जेवढे लीड मिळाले आहे, तेवढे प्रथमतः मी वृक्षारोपण करणार आहे. या वृक्षालागवडीसाठी एक समिती ही तालुक्यात स्थापन केली आहे. त्यासाठी त्या गावातील मतांच लीड हे निमित्त असून मी झाडे लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. निवडणुका झाल्या, राजकारण संपले. आता शहरापासून गाव खेड्यातील प्रत्येकाने सर्व जाती धर्मातील लोकांनी एकत्रित येऊन सामाजिक कार्यावर भर दिला पाहिजे. त्यासाठी मी अहोरात्र तुमच्या सेवेस कायम असेल असेही नूतन आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.
हॅलो, मी डॉक्टर बाबासाहेब बोलतोय...
गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर सामाजिक कामासाठी डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी मोठे लक्ष दिले होते. तालुक्यातील प्रत्येक सुखदुःखाच्या कार्यक्रमाचे घरी जात असत. कोणाचा वाढदिवस असो किंवा कोणत्याही कामासाठी त्यांच्याकडे जाणे डॉक्टरांना जमले नाही तर ते 'हॅलो, मी डॉक्टर बाबासाहेब बोलतोय..' असे म्हणून त्यांना फोन करीन असत. या त्यांच्या 'हॅलो मी डॉक्टर बोलतोय..' हे वाक्यात तालुक्यातील घराघरात पोहोचले होते. त्याचाच फायदा या निवडणुकीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांना मोठा झाल्याचे दिसून आले.



No comments:
Post a Comment