Recent Tube

Breaking

Tuesday, July 23, 2024

नीरेच्या पाण्यातून तिसंगी, चिंचोली तलावासह शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार.



नीरेच्या पाण्यातून तिसंगी, चिंचोली तलावासह शेतीसाठी आवर्तन सोडण्यात येणार.


रणसंग्राम न्यूज संपादक नितीन होवाळ मो नं 9112049614



पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिवसेनेचे आ.शहाजीबापू पाटील यांचे आश्वासन



सांगोला (तालुका प्रतिनिधी): नीरा देवधर प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तालुक्यात शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नीरा उजवा कालव्यामधून पाणी सोडून तिसंगी, चिंचोली तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार आहेत. तसेच गेल्या आवर्तनात ज्या फाट्यांना पाणी मिळाले नाही, त्या फाट्यांना या आवर्तनात प्राधान्याने पाणी देण्यात येणार आहे. पावसाळी आवर्तनात लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

यंदा सांगोला तालुक्यात दमदार पावसाची नोंद झाली असली तरी ग्रामीण भागातील विहिरी, ओढे, नाले कोरडेठाक पडलेले आहेत. श्रावणात पाऊस पडेल या आशेवर शेतकर्‍यांनी पेरणी केलेल्या खरीप हंगामातील पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शेतीच्या पाण्याचा तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे. नीरा खोऱ्यातील वीर, देवधर, भाटघर, गुंजवणी धरणांवर जोरदार पाऊस सुरू झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नीरा उजवा कालव्यातून पाणी सोडल्यास ऐन पावसाळ्यात शेतातील जळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत. त्यामुळे लवकरात लवकर नीरा उजवा कालव्याचे आवर्तन चालू करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नीरा उजवा  कालव्याच्या पाण्याचे वाटप करत असताना पाण्याची सर्वाधिक गरज असलेल्या सांगोला तालुक्याला तसेच तिसंगी तलावासाठी प्राधान्याने पाणी द्यावे अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांच्याकडे केली आहे.

नीरा उजवा कालव्यातून पंढरपूर तालुक्यातील तिसंगी आणि सांगोला तालुक्यातील चिंचोली हे दोन्ही तलाव शंभर टक्के भरून घेण्यात येणार आहेत. तसेच गेल्या आवर्तनात ज्या फाट्यांना पाणी मिळाले नाही, त्या फाट्यांना या आवर्तनात प्राधान्याने पाणी देण्यात येणार आहे. पावसाळी आवर्तनात लाभक्षेत्रातील शेतीला पूर्ण क्षमतेने पाणी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. नीरा उजवा कालव्यातून तिसंगी चिंचोली तलाव भरून तसेच फाट्यांना पाणी सोडल्यानंतर पिण्याच्या पाण्याचा, जनावरांच्या पाण्याचा तसेच शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचे शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment